नवी दिल्ली :
नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता मोठा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः रात्री थेट जंतर मंतरवर दाखल झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि आपला पाठिंबा जाहीर केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताच CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेते एकत्र आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या जंतर मंतरवरील या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे आंदोलक तरुणांना आणि कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, केंद्र सरकारविरोधातील हा लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













