कोल्हापूर फटाका चाचणी: सायबर कॉलेज ग्राऊंडवर ध्वनी मापन संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):
दिवाळी सणापूर्वी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर फटाका चाचणी गुरुवारी रात्री सायबर कॉलेज ग्राऊंड येथे पार पडली. या चाचणीत सुट्टे फटाके, फटाक्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची डेसिबल पातळी मोजण्यात आली.

शासन नियमानुसार विहित मर्यादेत असणाऱ्या फटाक्यांना प्रशासनाकडून दिवाळी सणादरम्यान बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करून विहित मर्यादेत नसणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, असे फटाके बाजारात विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी यंदाच्या दिवाळीत पर्यावरणपूरक आणि कमी आवाजाच्या फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले.
या चाचणीवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, रोहीदास मातकर, कोल्हापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाचे केवळ लोट, सायबर कॉलेज पर्यावरण विभागाचे अभियंता डी.एस. माळी, डॉ. पूजा पाटील, ‘निसर्ग मित्र’ संस्थेचे अनिल चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.