मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
सोलापूर

१० वर्षांपूर्वी बळी जाऊनही ‘पीडब्ल्यूडी’ सुस्त? सोलापुरात देवदर्शन करून परतणाऱ्या ८ भाविकांचा विहिरीत बुडून अंत; ‘त्या’ देवदूतामुळे ६ जणांचे प्राण वाचले

सोलापूर: तांदुळवाडी येथे भीषण अपघातानंतर विहिरीत बुडालेले पिकअप वाहन दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.

वेळापूर (सोलापूर):
म्हसवड (जि. सातारा) येथून देवदर्शन आटोपून पंढरपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला तांदुळवाडी जवळ झालेला भीषण अपघात केवळ नियतीचा खेळ नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ढिसाळ कारभाराचा जिवंत पुरावा ठरला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या उघड्या विहिरीत पिकअप कोसळून एका ६ महिन्यांच्या चिमुरड्यासह ८ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने पंढरपूर येथील ‘बावचे’ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१० वर्षांनंतरही प्रशासन झोपेतच; सुरक्षेचा बोजवारा

या भीषण अपघाताने प्रशासकीय निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच धोकादायक वळणावर आणि याच विहिरीत सुमारे १० वर्षांपूर्वी जागरण गोंधळ करणाऱ्या कलाकारांच्या जीपला असाच अपघात झाला होता, ज्यामध्ये ६ जणांना जीव गमावावा लागला होता. एवढी मोठी दुर्घटना घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या विहिरीला साधा कठडा किंवा रस्त्याच्या बाजूला क्रॅश बॅरिअर (सुरक्षा भिंत) उभारण्याची तसदी घेतली नाही. अरुंद रस्ता, तीव्र वळण आणि रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे हा रस्ता चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. काल रात्रीही याच प्रशासकीय दिरंगाईची किंमत ८ निष्पाप जीवांना मोजावी लागली.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती; निळकंठने ६ जणांना मृत्यूच्या दारातून खेचले

अपघात झाला त्या वेळी विहिरीत पाणी प्रचंड होते आणि गाडी पूर्णपणे बुडाली होती. आरडाओरड ऐकून भाळवणी येथील निळकंठ चौगुले या तरुणाने स्वतःच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता थेट विहिरीत उडी घेतली. विहिरीच्या काळोखात आणि पाण्यात अंदाज येत नसतानाही निळकंठने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे विहिरीत बुडत असलेल्या ६ जणांना वेळेत बाहेर काढणे शक्य झाले. “माझ्या डोळ्यांसमोर लोक बुडत होते, त्यांना वाचवणे हेच माझे एकमेव ध्येय होते,” अशा शब्दांत निळकंठने आपला थरारक अनुभव सांगितला. त्याने दाखवलेल्या या धाडसामुळे ६ जणांचे प्राण वाचले, अन्यथा मृतांचा आकडा आणखी मोठा झाला असता.

अपघातातील मृत आणि जखमींची नावे:

मृत्यू झालेले भाविक:

  • इंदुबाई बावचे (वय ६० वर्ष)
  • पुजा सातोरे (वय २३ वर्ष)
  • पुजा बावचे (वय २७ वर्ष)
  • अश्विनी बावचे (वय २७ वर्ष)
  • संस्कार बावचे (वय १४ वर्ष)
  • संस्कृती बावचे (वय १४ वर्ष)
  • आरว सातोरे (वय ८ वर्ष)
  • समर्थ बावचे (वय ६ महिने)
    गंभीर जखमी नागरिक (पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू):
    संदीप बावचे (३६), बालाजी बावचे (३२), जीया बावचे (४), आरव बावचे (अडीच वर्षे), शशीकला जाधव (५०) आणि सागर चौगुले (२५).

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत, पण सुरक्षा भिंतीचे काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींच्या मोफत उपचारांचे आदेश दिले आहेत. मात्र, “मदत जाहीर करण्यापेक्षा प्रशासनाने आधी अशा धोकादायक विहिरींना कठडे बांधावेत, जेणेकरून कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत