More

    गुटखा माफियांचे धाबे दणाणले! गुटखा विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर आता थेट ‘मोका’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक

    Published on:

    ​दूध भेसळ आणि रुग्णालयांच्या मनमानीवरही कडक पावले; रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे घेण्याची सक्ती बेकायदेशीर

    ​मुंबई/पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफिया आणि अन्न भेसळ करणाऱ्यांवर थेट ‘मोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचे ऐतिहासिक आणि कठोर आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांवर आता यापुढे अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे. १२ जून रोजी एका विशेष पत्रकार परिषदेत मुंढे यांनी या मोठ्या कारवाईची घोषणा केली.

    ​गुटखा रॅकेटवर ‘मोका’चा फास

    राज्यात गुटकाबंदी असतानाही छुप्या मार्गाने गुटख्याची विक्री आणि सेवन होत असल्याचे वास्तव आहे. सार्वजनिक आरोग्याला असलेला हा धोका कायमचा नष्ट करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. अन्न सुरक्षा कायदा २००६ आणि ‘मोका’ कायदा १९९९ च्या संबंधित कलमांनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. यापुढे गुटखा उत्पादक, पुरवठादार, ट्रान्सपोर्टर्स, गोडाऊन मालक, होलसेल आणि रिटेल विक्रेते तसेच या बेकायदेशीर व्यवसायाला फायनान्स (अर्थपुरवठा) करणाऱ्यांवरही ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

    ​मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १० वर्षांत राज्यात गुटखा प्रकरणी मोठ्या प्रमाणात एफआयआर दाखल झाले आहेत. यामध्ये २६० उत्पादक, २४८ पुरवठादार आणि ७०३ ट्रान्सपोर्टर्सवर कारवाई झाली असली तरी हे रॅकेट मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी आता ‘मोका’सारख्या कठोर कायद्याची गरज निर्माण झाली होती. २५ मे ते ११ जून दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत ३ कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    ​रुग्णांना मोठा दिलासा: मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करता येणार नाही

    याचबरोबर तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या हिताचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही रुग्णालयाला त्यांच्या रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ त्यांच्याच ‘इन-हाऊस फार्मसी’ किंवा मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. रुग्ण स्वतःच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार बाहेरील कोणत्याही मेडिकलमधून औषधे घेऊ शकतात. रुग्णालयांनी अशी सक्ती केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी जारी केले आहेत. हा रुग्णांचा अधिकार असून रुग्णालयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    ​दूध भेसळ खपवून घेतली जाणार नाही

    डेअरी उत्पादक आणि दूध विक्रेत्यांसोबत घेतलेल्या विशेष बैठकीत मुंढे यांनी स्पष्ट केले की, दुधातील भेसळ कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. फसाय (FSSAI) च्या मानकांचे तंतोतंत पालन करणे सर्वच आस्थापनांना बंधनकारक आहे. दर्जेदार आणि सुरक्षित अन्न व दूध नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही उत्पादकांची प्राथमिक जबाबदारी असून, जे नियम पाळणार नाहीत किंवा निकृष्ट दर्जाचा माल विकतील, त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दमही मुंढे यांनी दिला आहे.

    ​सार्वजनिक आरोग्य हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट व कडक संदेश तुकाराम मुंढे यांनी या माध्यमातून दिला आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here