[वांबोरी घाटामध्ये गोणीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन माहिती घेत तपासाला सुरुवात केली आहे. दोन गोण्यांमध्ये मृतदेह वांबोरी घाटात आणून टाकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने एक आणि पायाच्या बाजूने दुसरी अशा दोन गोण्या चढवून मधून शिवण घालून तो घाटात फेकून दिला होता. सुमारे दोन दिवसांपूर्वी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह घाटात आणून टाकल्याचा संशय आहे. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून खुनाच्या संशयावरून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दोन वर्षांपूर्वीही आढळला होता बॅगेत भरलेला मृतदेह सुमारे दोन वर्षांपूर्वीही वांबोरी घाटाच्या परिसरात एका बॅगमध्ये भरलेला मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याचीही ओळख अद्याप पटलेली नाही व त्याचा तपासही लागलेला नाही. आता पुन्हा याच भागात मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवण्याचे व तपास करण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर असणार आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/a-body-stuffed-in-a-sack-was-found-at-vambori-ghat-137235267.html