[
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाजन यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. “ज्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. नाशिकच्या या कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी उभे राहून थेट आक्षेप घेतला. “संविधान निर्मात्यांचे नाव तुम्ही कसे काय विसरलात?” असा रोखठोक सवाल त्यांनी भर कार्यक्रमात विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे सोहळ्यात काही काळ गोंधळ उडाला. या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवार यांचा सडेतोड प्रहार या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन आणि सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली. “या मंडळींना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. हे तेच लोक आहेत ज्यांनी संविधान निर्मितीच्या काळात त्याला विरोध केला होता. यांचा संविधानावर विश्वास आहे का? ज्यांना संविधान निर्मात्याचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का?” असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. “हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे की लोकशाहीने, याचे उत्तर जनताच मागेल. संविधानावर विश्वास नसणाऱ्यांनी सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे,” असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. नेमके प्रकरण काय? नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे काही काळ कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेतले व सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी याप्रकरणी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रारही दाखल केली आहे. राजकीय वातावरण तापले संविधानाच्या उत्सवातच संविधान निर्मात्याचे नाव विसरल्याने गिरीश महाजन आणि भाजप सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे, कर्तव्यावर असताना मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुकही समाजमाध्यमांवर केले जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/vijay-vadettiwar-slams-girish-mahajan-over-babasaheb-ambedkar-remark-in-nashik-137052254.html
बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?:ज्यांना लाज वाटते, त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर संताप
Published on:
