पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या जुन्या कॅम्पसमधील ऑडिटोरियममध्ये संपन्न होणार आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या माऊलींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ या अजरामर ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्म, समता, प्रेम आणि अखंड मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. ज्ञानेश्वरांच्या याच क्रांतीकारी विचारांनी महाराष्ट्राची वारी परंपरा, समृद्ध संत साहित्य आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ केले आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून, माऊलींच्या आध्यात्मिक विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत परंपरेचे स्मरण आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमात ‘मोगरा फुलला’ या आध्यात्मिक-सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा आणि साहित्याचा परिचय करून दिला जाणार आहे. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते तसेच स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार श्री. गणेश शिंदे यांचे विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार असून, ते माऊलींच्या विचारांची आजच्या काळातील सुसंगतता उलगडून दाखवणार आहेत. भक्ती आणि ज्ञानाचा संगम असलेल्या या कार्यक्रमात पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, श्रोत्यांना एक आगळीवेगळी आध्यात्मिक मेजवानी मिळणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. श्रीराम पांडे यांनी पुणे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक आणि रसिकांना या प्रेरणादायी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. विमाननगर परिसरातील या सोहळ्यामुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचा हा उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.