More

    कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन:'चाहुलींचे अनवट नाद'मधून स्त्रीच्या देहमनाचा वेध; डॉ. पी. विठ्ठल यांचे प्रतिपादन

    Published on:

    [%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0 %E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8039%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%9F %E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6039%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE
    ‘कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या ‘चाहुलींचे अनवट नाद’ या कवितासंग्रहातून स्त्रीच्या देहमनाचा वेध घेतला आहे,’ असे निरीक्षण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख आणि सुप्रसिद्ध कवी, समीक्षक डॉ. पी. विठ्ठल यांनी नोंदवले. प्रिया धारूरकर यांच्या या कवितासंग्रहाचे समर्थनगरमधील शासकीय ग्रंथालयाशेजारच्या गांधी भवनात रविवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या आई मालती राघवेंद्र मुरुगकर यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवयित्री ललिता गादगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव आत्माराम जिगे, प्रकाशक कैलास अतकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्त्री जाणिवेचे विविध पदर डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रिया धारूरकर यांच्या कवितांच्या विविध पैलूंवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘धारूरकर यांच्या या संग्रहात सुमारे 85 कविता असून त्यातून मानवी नातेसंबंधांचा आणि विशेषतः स्त्रियांच्या भावविश्वाचा उच्चार करण्यात आला आहे. ही कविता ‘बाई’पणाच्या विविध स्थितीगतीचे आणि प्रेमानुभवाच्या पार्थिव-अपार्थिव भावस्थितीचे आरेखन करते. स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, तिच्या इच्छा-आकांक्षेचा आणि तिच्यात दडलेल्या विविध स्त्री-तत्त्वांचा शोध या संग्रहात घेतला आहे.’ पुरुषी मानसिकतेवर प्रहार संग्रहातील कविता केवळ हळव्या नसून त्या समकालीन पुरुषी मनोव्यवहारावर आणि राजकारणावरही भाष्य करतात. पुरुषांच्या अधिकारशाहीमुळे स्त्रीच्या सार्वजनिक अवकाशाचा झालेला संकोच आणि तिच्या अभिव्यक्तीवर लादलेले निर्बंध यावरही या कविता प्रकाश टाकतात. “तू आधी ठरव
    तुला मुखवटा हवा
    आहे की चेहरा
    मग आपण बोलूच
    तुझ्या पेहरावाबद्दल…” अशा ओळींतून कवयित्रीने स्त्रीच्या आंतरिक कोलाहलाला वाट करून दिल्याचे डॉ. विठ्ठल यांनी सांगितले. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम डॉ. पी. विठ्ठल म्हणाले की,’चाहुलीचे अनवट नाद या कवितासंग्रहात सीता, अहल्या, मीरा यांसारख्या सांस्कृतिक प्रतिमा आणि मिथकांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आधुनिक काळातील शॉपिंग मॉल्स आणि डे-नाईट शिफ्ट्स करणाऱ्या स्त्रियांच्या जगण्याचा ताळेबंदही मांडला आहे.’ अस्सल कविता टिकतेच ज्येष्ठ कवयित्री ललिता गादगे यांनी कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या कवितेचे बदलेले स्वरूप आणि तिचे भावविश्व उलगडून दाखवले. मराठीतली ही समर्थ आणि सक्षम कविता असून, तिने आपली वेगळी ओळख जपल्याचे निरीक्षण आवर्जुन नोंदवले. तर डॉ. सर्जेराव आत्माराम जिगे यांनी ‘कविता उदंड झाल्याचे अनेक जण म्हणतात. मात्र, जास्त कविता लिहिली गेली, तर बिघडले कुठे?’ असा सवाल केला. ‘वादळ आले की, पालापाचोळा उडून जातो. मात्र, जड वस्तू राहते. तसेच कवितेचेही आहे. अस्सल कविता टिकतेच,’ अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माय-लेकीचे हृदय मनोगत प्रिया धारूरकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ‘आपल्यावर भाषेचे संस्कार आईने केले. तिच्यामुळेच ही कविता फुलली,’ असे आवर्जुन सांगितले. ‘तब्बल दहा-ते बारा वर्षांनी कवितासंग्रह येतोय. या काळातले प्रतिबिंब त्यात उमटले आहे. अनुभवाने आणि कवितेने आपल्याला अधिक पोक्त केल्याचे’ त्या म्हणाल्या. तर प्रिया धारूरकर यांच्या आई मालती राघवेंद्र मुरुगकर यांनी ‘मुलीचा कवितासंग्रह आपल्या हस्ते प्रकाशित होतोय यापेक्षा आनंद आणखी कुठला? आपल्या मुलीचे असे कोडकौतुक होताना छान वाटतं,’ अशी प्रांजळ भावना व्यक्त करून सर्वांशी अनौपचारिक संवाद साधला. विजय पांचाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अक्षरसूक्त साहित्य मंडळ, मुक्तसृजन साहित्य संस्था, कैलास पब्लिकेशन, शताब्दी काव्य मंडळाचे सदस्यांसह शहरातील महत्त्वाचे कवी, रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. संबंधित वृत्तः नव्या पुस्तकाचे स्वागत:कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या ‘चाहुलींचे अनवट नाद’ कवितासंग्रहाचे 15 फेबुवारी रोजी प्रकाशन पाऊसवेळा VIDEO:आभाळ बरसत होतं, करुणा पांघरून, बुद्ध होऊन; आज प्रिया धारूरकर यांची कविता
    https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/priya-dharurkar-chahuliche-anvat-nad-book-launch-sambhaji-nagar-137221592.html

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here