पुणे: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत सर्रास सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने, रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने पुणे मनपा मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. बांधकाम विकास विभाग आणि संबंधित झोनमधील जबाबदार अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच ही अनधिकृत बांधकामे फोफावत असल्याचा थेट आरोप संघटनेने केला असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
या आंदोलनात रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अजयभाऊ भालशंकार, सरचिटणीस तथा उपोषणकर्ते दत्ताभाऊ शेंडगे, सरचिटणीस भीमराव सोनवणे, महिला आघाडीच्या स्नेहा गायकवाड आणि शहर प्रमुख अशफाज पठाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
रिपब्लिकन सेना युवक आघाडीने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोथरूड, हिंगणे खुर्द, आनंद विहार, शिवाजीनगर आणि वडगाव बुद्रुक यांसारख्या विविध भागांतील अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाला वेळोवेळी लेखी पुराव्यांसह अवगत करण्यात आले होते. मात्र, बांधकाम विकास विभाग आणि स्थानिक झोन अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
या प्रमुख तक्रारींवर प्रशासनाने केली पाठफिरव:
- कोथरूड (पौड रोड): येथील बांधकाम विकास झोन क्र. ६ अंतर्गत सर्व्हे नंबर ७०, बुट्टे पाटील कॉम्प्लेक्स परिसरात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अनधिकृत बांधकामाबाबत अर्ज करूनही कोणतीही कारवाई झाली नाही.
- हिंगणे खुर्द: सर्व्हे नंबर ९ पैकी, गौरीशंकर सोसायटीसमोर नगरसेवकांच्या कथित वरदहस्ताने दहा दुकानांचे अनधिकृत बांधकाम पूर्ण झाले असून, झोन क्र. २ च्या अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगले आहे.
- आनंद विहार परिसर: येथील बीडीपी क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत.
- शिवाजीनगर (भांबुर्डा, जुना तोफखाना): सर्व्हे नंबर ४२, पुष्कर चेंबर्स या इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असतानाही झोन क्र. ६ कडून अभय दिले जात आहे.
- वडगाव बुद्रुक (बीडीपी हिलटॉप): सर्व्हे नंबर ४३ ते ४९ मधील वरील परिसरात २० ते २५ अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. प्रशासनाला लेखी पत्रव्यवहार करूनही स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे अधिकारी कारवाई टाळत असल्याचा आरोप आहे.
या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी:
संघटनेने पालिका आयुक्तांकडे खालील अधिकाऱ्यांच्या तात्काळ चौकशीची आणि निलंबनाची मागणी केली आहे:
१. प्रवीण शकुंतला गजानन शेंडे (अधीक्षक अभियंता, बांधकाम विकास विभाग, पूर्ण मनपा)
२. नेवाळे साहेब (अभियंता, झोन क्र. २)
३. समीर गडे साहेब (कनिष्ठ अभियंता, झोन क्र. ६)
४. शिंदे साहेब (कनिष्ठ अभियंता, झोन क्र. ६)
जोपर्यंत या भ्रष्ट आणि हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही आणि अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली जात नाहीत, तोपर्यंत पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील हे बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मनपा वर्तुळात आणि बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.