More

    पुणे जिल्हा परिषदेचा राज्यात डंका; ई-गव्हर्नन्स आणि राज्य सेवाकर्मी पुरस्कारात पटकावला प्रथम क्रमांक

    Published on:

    ​पुणे: ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ आणि ‘राज्य सेवाकर्मी पुरस्कार’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेतली.

    ​पालकमंत्र्यांकडून कौतुक आणि गौरव

    ​पुणे जिल्हा परिषदेने प्रशासकीय कामकाजात आणलेली पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे हे यश संपादन केले आहे. माननीय पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले. प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक करून, हे मॉडेल इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

    ​प्रमुख उपस्थिती

    ​या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी पालकमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत खरात आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी श्रीमती शालिनी कडू उपस्थित होत्या.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here