पुणे/भुवनेश्वर : ओडिशामध्ये करण्यात आलेली टाटा पॉवर कामगार कपात ही खाजगीकरणाचा अत्यंत भयंकर चेहरा ठरली असून, तब्बल १० हजार कंत्राटी कामगारांना एका झटक्यात नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेने देशातील कामगार वर्गात मोठी खळबळ उडाली असून, नोकरी गेल्याच्या नैराश्यातून एका तरुण कामगाराने आत्महत्या केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून, “आज वेळ ओडिशावर, उद्या महाराष्ट्रावर” अशी भीती व्यक्त करत भारतीय मजदूर संघाशी संलग्न ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा’ने पुण्यात महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री आणि महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे व प्रदेशाध्यक्ष निलेश खरात हे तडकाफडकी भुवनेश्वर येथील आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. हजारो कामगारांच्या आक्रोशामध्ये सहभागी होत त्यांनी महाराष्ट्राचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना सचिन मेंगाळे यांनी प्रशासनावर तोफ डागली. “अनेक वर्षे घाम गाळणाऱ्या कामगारांना खर्च कपातीच्या नावाखाली रस्त्यावर आणणे हा घोर अन्याय आहे. खाजगीकरणाचा सर्वात मोठा फटका गरिबांना बसत आहे. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून सर्व १० हजार कामगारांना विनाशर्त पुन्हा कामावर घ्यावे,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
या संकटावर बोलताना निलेश खरात म्हणाले, “सरकार नवीन रोजगार देऊ शकत नाही आणि असलेले रोजगारही हिरावून घेत आहे. तरुणांनी जगायचं कसं? खाजगीकरणाच्या या लाटेत सर्व कामगारांनी आता संघटित झालेच पाहिजे, अन्यथा देशातील तरुणांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.”
पुण्यात महावितरणबाहेर निदर्शने
या कामगार कपातीचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर भव्य ‘गेट मिटिंग’ (निषेध द्वार सभा) घेण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, तुकाराम डिंबळे, सुरेश जाधव, उमेश आणेराव, राहुल बोडके, निखिल टेकवडे, मार्गदीप मस्के आणि योगेश महांगरे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. वाढत्या खाजगीकरणामुळे केवळ कंत्राटीच नव्हे, तर भविष्यात कायमस्वरूपी कामगारांच्याही नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, अशी भीती यावेळी कामगार नेत्यांनी व्यक्त केली.