कुरकुंभ (प्रतिनिधी):
भारतीय मजदूर संघाच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘आक्रोश मोर्चा’च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कुरकुंभ एमआयडीसी परिसरात आज व्यापक जनजागृती करण्यात आली असून, येथील कामगारांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
मोर्चाच्या नियोजनासाठी कुरकुंभ एमआयडीसीतील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये बॅनर्स लावण्यात आले असून ‘गेट मीटिंग’च्या माध्यमातून कामगारांशी थेट संवाद साधण्यात आला. या जनजागृती मोहिमेत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी कामगारांना संबोधित करून मुंबईतील आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.
यावेळी कुरकुंभ एमआयडीसीमधील कारगील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इटन्सस फाईन केमिकल्स, मोडेप्रो, सिल्पा लिमिटेड, हेंकल अॅडहेसिव्ह्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमधील कामगारांसह दौंड तालुक्यातील विविध उद्योगांमधील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
१६ एप्रिलच्या मुंबईतील महामोर्चात कुरकुंभ परिसरातून हजारोंच्या संख्येने कामगार एकवटणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप ‘भारतीय मजदूर संघ जिंदाबाद’च्या घोषणांनी करण्यात आला. या प्रसंगी विविध कामगार प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.