More

    आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय कामगार अडकले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    Published on:

    ​अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाची पंतप्रधान मोदींकडे धाव; कामगारांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी साकडे

    ​पुणे: आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथे रोजगारासाठी गेलेल्या हजारो भारतीय कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या ‘अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघा’ने आखाती देशांत अडकलेल्या भारतीय कामगारांचे संरक्षण, सुरक्षा आणि गरज पडल्यास त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी केली आहे. या गंभीर विषयावर महासंघाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून भारतीय कामगारांच्या हितासाठी भारत सरकारसोबत सतत पाठपुरावा केला जात असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.

    ​आखाती देशांतील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाची नुकतीच एक महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत भारतातील विविध राज्यांमधून आखाती देशांत कामासाठी गेलेल्या कामगारांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. सध्या तेथील कामगारांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यांच्या जीविताला असलेला धोका यावर सखोल चर्चा करण्यात आली. या आढावा बैठकीनंतर महासंघाने अधिकृतपणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना लेखी पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

    ​महासंघाने केंद्र सरकारकडे प्रामुख्याने तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये आखाती देशांतील भारतीय कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करणे, संकटात सापडलेल्या कामगारांना तातडीने मदत पोहचवणे आणि परिस्थिती अधिक बिघडल्यास या सर्व कामगारांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. देशात आणि परदेशात कार्यरत असलेल्या प्रत्येक कंत्राटी कामगाराच्या हक्कांचे आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी महासंघ कटिबद्ध असून, या संकटकाळात कामगारांच्या हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.

    ​यासोबतच, आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व भारतीय कामगारांना महासंघाने आवाहन केले आहे की, त्यांनी तेथील भारतीय दूतावासाच्या नियमित संपर्कात राहावे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी किंवा समन्वयासाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सुचवण्यात आले आहे. हे आवाहन महासंघाचे अध्यक्ष कंदी श्रीनिवास गौडा आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी संयुक्तपणे केले आहे. या संकटकाळात भारतीय कामगारांना धीर देण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान महासंघाने पेलले आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here