सह्याद्रीवर रंगला सोहळा; ठाणे जिल्ह्याने पटकावले दोन-दोन पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी.
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाजात ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या १० सनदी अधिकाऱ्यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ आणि ‘सेवाकर्मी’ कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम ठरलेल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात ठाणे जिल्ह्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ अशा दोन्ही श्रेणीत पुरस्कार पटकावून राज्याच्या प्रशासकीय नकाशावर आपला विशेष दबदबा निर्माण केला आहे.
प्रशासनातील ‘बेस्ट’ शिलेदारांची संपूर्ण यादी:









सर्वोत्तम जिल्हाधिकारी (Best District Collectors):
तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा प्रशासनात पारदर्शकता आणणारे ५ सर्वोत्तम जिल्हाधिकारी:
- रोहन घुगे (जळगाव)
- श्रीकृष्ण पांचाळ (ठाणे)
- किर्ती पुजार (धाराशिव)
- वर्षा ठाकूर-घुगे (लातूर)
- अमोल येडगे (कोल्हापूर)
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Best CEOs):
ग्रामीण विकास आणि ई-गव्हर्नन्स सुधारणांत आघाडीवर असलेले ५ सर्वोत्तम सीईओ:
- गजानन पाटील (पुणे)
- विशाल नरवाडे (सांगली)
- रणजित यादव (ठाणे)
- विनायक महामुनी (नागपूर)
- ओमकार पवार (नाशिक)
तंत्रज्ञानामुळे प्रशासन लोकाभिमुख : मुख्यमंत्री
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पारदर्शकता आणणे हेच ‘गुड गव्हर्नन्स’चे खरे लक्षण आहे. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेमुळे शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहोचणे सुलभ झाले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत नाविन्यपूर्ण प्रयोग केले, त्यांचा हा गौरव म्हणजे इतर अधिकाऱ्यांसाठी एक प्रोत्साहन आहे.”
ठाणे जिल्ह्याची दुहेरी बाजी!
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ठाणे जिल्हा. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषद सीईओ रणजित यादव या दोघांनीही आपापल्या विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याने ठाणे जिल्ह्याला दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
No Comment! Be the first one.