संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात – वर्तमान महाराष्ट्र
वर्तमान महाराष्ट्र
संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात; डॉ. मुरहरी केळे यांची समारोह समितीच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई (प्रतिनिधी: जगदीप वनशिव) | दि. ३० मार्च २०२६
मुंबई/दादर: संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद” या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच दादर येथील श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. मुरहरी केळे यांच्या शुभहस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त मा. प्रशांत देशमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. भगवान पाटील, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कर्करोग तज्ञ डॉ. शिवम शिंगला, डॉ. अजय यादव, वाघमोडे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. याच प्रसंगी संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती समारोह समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे यांची निवड जाहीर करण्यात आली. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते केळे यांचा महात्मा फुले पगडी, उपरणे, ‘चोखोबावाणी’ दिनदर्शिका आणि ‘संत सोयराबाई : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
“संत गाडगेबाबांचे विचार केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचे भक्कम साधन आहेत. आजच्या काळात स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्याची गरज आहे.”
– मा. प्रशांत देशमुख (अध्यक्ष, श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट)
या बोधचिन्हामध्ये संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार, समाजप्रबोधन आणि समतेच्या मूल्यांची जपणूक यांचे प्रभावी प्रतीकात्मक दर्शन घडते. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “संत गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजप्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश दिला. हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जागृती घडवण्याचा आमचा मानस आहे.”
निमंत्रक सचिन पाटील यांनी सांगितले की, ही परिषद संकल्पना राज्यभर राबविली जाणार असून, विभागवार किमान १० प्रबोधन परिषदांचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अज्ञानाविरुद्ध विचारांचा दीप प्रज्वलित केला जाईल. रविवार, २९ मार्च २०२६ रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती समारोह समिती, महाराष्ट्र व संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी अविनाश अभंगराव, विजयसिंह जगदाळे, निखिल मस्के, कल्याण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक: श्री. उजगरे रवी रघुनाथ
संपर्क: 072-7676-1515 | ईमेल: [email protected]
कार्यालय: ६२०, सूर्यमुखी गणपती मंदिराजवळ, म्हाळुंगे, पुणे – ४११ ०४५
वेबसाइट: vartmanmaharashtra.com | RNI: MHMAR/25/A4605