१४ व्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर मराठी साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर; जुलैमध्ये बारामतीत रंगणार साहित्य सोहळा
बारामती (प्रतिनिधी – जगदीप वनशिव):
अखिल मराठी साहित्य सांस्कृतिक कला व आरोग्यदायी विकास परिषद (महाराष्ट्र राज्य) आणि लिंबराज फिल्म्स, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘१४ व्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर मराठी साहित्य संमेलना’तील विविध पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. बी. डी. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. येत्या जुलै महिन्यात बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिर (प्रशासकीय भवन) येथे हा रंगतदार साहित्य सोहळा पार पडणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संतोष मचाले जबाबदारी सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
दिग्गज पाहुण्यांची मांदियाळी
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), खासदार सुप्रियाताई सुळे (बारामती), खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव), आमदार रोहित पवार (कर्जत-जामखेड), माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि बॉलिवूड अभिनेत्री रूपाली पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी खालीलप्रमाणे:






- ॲड. जयश्री सोनवणे – रणरागिणी प्रेरणा पुरस्कार
- जगदीप वनशिव (पत्रकार, निवेदक, रानकवी) – महाराष्ट्र भूषण निवेदक पुरस्कार
- माणदेश कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे – संत चोखामेळा साहित्य गौरव पुरस्कार
- लोककवी सीताराम नरके – डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य गौरव पुरस्कार
- राहुल रामचंद्र जाधव (ज्येष्ठ छायाचित्रकार) – संस्कृती पुरस्कार
- दत्तात्रय निकाळजे – वृक्षवल्ली संत तुकाराम गौरव पुरस्कार
- ज्ञानेश्वर शिळवणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर साहित्य गौरव पुरस्कार
- डॉ. सुनीता धर्मराव – साहित्यरत्न पुरस्कार
- नवनाथ सोनवणे – उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार
येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन आणि परिसंवाद अशा विविध दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींसाठी हा सोहळा एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
