माजलगाव (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जयभीम नगर, माजलगाव येथील फुले-आंबेडकर जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ‘महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु का मानले?’ या विषयावर सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्रा. संजय बागुल यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
विचारांची नाळ जुळली म्हणूनच त्यांना गुरु मानले
आपल्या व्याख्यानात प्रा. बागुल म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५१ साली नाशिक येथे स्पष्ट केले होते की, तथागत भगवान गौतम बुद्ध हे माझे पहिले, संत कबीर दुसरे आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तिसरे गुरु आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही महापुरुषांची आणि बाबासाहेबांची कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आणि ते वेगवेगळ्या जातींतील होते. परंतु, त्यांच्या विचारांमधील साम्य आणि मानवमुक्तीचा लढा पाहून बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले.”
पाण्यासाठी लढा: गुरुचा वारसा शिष्याने चालवला
महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या मालकीचा पाण्याचा हौद खुला करून दिला होता. तर, भगवान बुद्धांनी रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध टाळून गृहत्याग केला होता. आपल्या या गुरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, असे प्रा. बागुल यांनी नमूद केले.
स्त्रीमुक्ती आणि सामाजिक क्रांती
महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. ब्राह्मण विधवा काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला आणि बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. याच कार्याचा वारसा पुढे चालवत बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ‘हिंदू कोड बिल’ आणून महिलांना कायदेशीर हक्क आणि अधिकार मिळवून दिले.
शेतकऱ्यांचे कैवारी
महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना इंग्रज दरबारी मांडले. बाबासाहेबांनीही १९५४ मध्ये मोठा मोर्चा काढून आणि कोकणातील ‘खोती पद्धत’ बंद करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या. आज अनेक नेते शेतकऱ्यांच्या नावावर स्वार्थ साधत असताना, खरे शेतकऱ्यांचे नेते फुले-आंबेडकरच होते, असे प्रतिपादन प्रा. बागुल यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जयभीम नगर येथे सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक सदानंद भैया प्रधान, नगरसेवक रफिक भैया, अविनाश बनसोडे, रूपचंद कांबळे, चंद्रमणी डोंगरे, विजय पोळ, दीपक टाकणखार, पत्रकार किशन भदर्गे, प्रा. सुदर्शन स्वामी, शिक्षक नेते राजकुमार सोनवणे, राजेश पोटभरे, अशोक डोंगरे, लक्ष्मण पोटभरे, अशोक मगर, दिनेश निसर्गंध, अतुल भैय्या भदर्गे, विनय पोटभरे, राजू कांबळे यांच्यासह फुले-आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://whatsapp.com/channel/0029Va4t1BU7NoZuYNJFvn0K: माजलगाव : ‘महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला’ – प्रा. संजय बागुल