चेंबूर येथे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा! वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवरायांना अभिवादन

0
69

चेंबूर येथे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा! वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवरायांना अभिवादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी):

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, चेंबूर-पांजरपोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

FB IMG 1771513647450

याप्रसंगी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांची उपस्थिती होती. त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासोबत मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महासचिव सतिश राजगुरू, मुंबई महिला आघाडी महासचिव ॲड. प्रणाली कांबळे, हरिश काशिद यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

पांजरपोळ येथील या पुतळा परिसरात सकाळी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण चेंबूर परिसर दुमदुमून गेला होता. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले.

शिवरायांचे विचारच देशाला दिशा देणारे: रेखाताई ठाकूर

अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचा हा सर्वसमावेशक विचार आणि रयतेच्या कल्याणाचे धोरण आजही देशाला दिशा देणारे आहे. वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराजांच्या विचारांची आज मोठी गरज आहे.”

या सोहळ्यादरम्यान शिवभक्तांसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि अल्पोपहाराचेही नियोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Please enter your comment!
Please enter your name here