संपादकीय: सरन्यायधीशांवरचा हल्ला: केवळ ‘बूट’ नव्हे, ‘जाती’ आणि ‘मानसिकते’ वरचा घाव!
सरन्यायाधीशांवरचा हल्ला: केवळ ‘बूट’ नव्हे, ‘जाती’ आणि ‘मानसिकते’वरचा घाव!
सर्वोच्च न्यायालयात जे घडले, ते केवळ एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला इतके साधे नाही. ही घटना देशाच्या सर्वोच्च न्यायपीठाला, न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदाला आणि त्या पदावर विराजमान असलेल्या एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला थेट आव्हान देणारी आहे. ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही,’ असे म्हणत हा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यातून केवळ कायद्याचा अपमान झाला नाही, तर देशातील जातिव्यवस्थेची पकड आणि काही लोकांची ब्राह्मणी मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे, याची दाहक जाणीव झाली.
एका प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि वकिली व्यवसायातील व्यक्तीने, देशाच्या सरन्यायाधीशांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीवर, थेट कोर्टरूममध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत चिंताजनक आहे. जर न्यायव्यवस्थेच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीसोबत असे घडू शकते, तर सामान्य जनता, विशेषतः मागासवर्गीय समाजातील लोक, कोर्टाच्या बाहेर आणि आत किती असुरक्षित असतील, याची कल्पना करणेही कठीण आहे.
हल्ला करणारा ‘सनातन धर्माचा अपमान’ सहन न झाल्याचे कारण देतो, पण त्याचा रोख अप्रत्यक्षपणे सरन्यायाधीशांच्या ‘जाती’वर होता का, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे समोर येतो. या घटनेतून स्पष्ट होते की, काही लोकांच्या मनात आजही जातीय द्वेषाचे विष इतके खोलवर भिनलेले आहे की, त्यांना ‘सर्वोच्च’ पद भूषवणारा एखादा दलित व्यक्ती पाहणेही असह्य होते.
हा प्रकार तेव्हा घडत आहे, जेव्हा आपल्याच समाजात काही लोक सामाजिक न्यायाऐवजी ‘आर्थिक निकष’ यासारख्या चर्चांमध्ये गुरफटलेले आहेत. सामाजिक न्यायाच्या लढाईची धार बोथट करण्याचा प्रयत्न होत असतानाच, ही घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे. न्यायमूर्ती गवईंना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करताना हल्लेखोराने त्यांची ‘जात’ पाहिली की ‘आर्थिक निकष’? याचे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे – त्यांची जात! त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीमुळेच त्यांना लक्ष्य केले गेले.
ही घटना आपल्या समाजाला आरसा दाखवते. अजूनही जात ही ओळख, कर्तृत्व आणि सन्मानापेक्षा मोठी मानली जाते. म्हणून, आता सामाजिक न्यायाची लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे. केवळ कायद्याने नव्हे, तर विचारांनी आणि मानसिकतेने या जातीयवादाला मूठमाती दिल्याशिवाय ‘न्याय’ या शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त होणार नाही.
न्यायमूर्ती गवई यांनी या घटनेवर शांतपणे ‘मी विचलित झालो नाही’ अशी प्रतिक्रिया दिली असली तरी, या हल्ल्याने संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या आणि लोकशाही मूल्यांच्या आत्म्यावर घाव घातला आहे. या घटनेचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही, तर यामागील जातीयवादी मानसिकतेचा मूळापासून नायनाट करणे आवश्यक आहे.
– वर्तमान महाराष्ट्र (News Portal)
