भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून उचलले पाऊल; सुनेत्रा वहिनींकडे सुपूर्द केले पत्र’
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल, शुक्रवार २० मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले.
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या विविध माध्यमांतून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी, यासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक जीवनात पारदर्शकता जपण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले होते, त्यानंतर चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाबाबत आपण लवकरच सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता या राजीनाम्यावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.