
“कुतुहल – बालगीत संग्रह प्रकाशन सोहळा व कविसंमेलन संपन्न
प्रतिनिधी – जगदीप वनशिव
नवी मुंबई – वाशी बालसाहित्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या “कुतुहल – बालगीत” संग्रह प्रकाशन सोहळा नवी मुंबई वाशी येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला साहित्य, कला व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे आयोजक अस्मिता साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. पहिले सत्र कवियत्री सुचिता बागडे खाडे यांचं कुतूहल बालगीत संग्रह प्रकाशन सोहळा आणि दुसरे सत्र माय मराठी भाषेवरील कवितांचं मायमराठी२०२५ हे कवी संमेलन.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व मराठी अभिमान गीताने झाली बालगीत संग्रहाच प्रकाशन दैनिक आपलं नवे शहर, नवी मुंबई चे उपसंपादक मा. श्री राजेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला कुतूहलचे प्रकाशक आणि ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर, तसेच लेखिका कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ, आणि वैद्यकीय अधिकारी गीतकार गझलकार डॉ गजानन मिटके प्रमुख पाहूणे म्ह्णून उपस्थित होते. बालसाहित्यिक, कवी व शिक्षणतज्ज्ञ यांनी कवयित्री चे मनःपूर्वक अभिनंदन करत बालमनावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या लेखनाची गरज अधोरेखित केली.
“कुतुहल – बालगीते” या संग्रहात बालवयातील भावविश्व, निसर्ग, कल्पनाशक्ती आणि जीवनमूल्ये या विषयांवर आधारित गोडसर, सोपी आणि प्रभावी बालकविता समाविष्ट आहेत. काही कविता केवळ मनोरंजन न करता मुलांमध्ये विचारांची पेरणी करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात पुस्तकातील काही निवडक बालगीते सादर झाली. त्यांना उपस्थित लहान मुलं आणि पालकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
बालकवितेच्या आनंदात न्हालेला होता. “कुतुहल – बालगीते” हे पुस्तक नव्या पिढीला साहित्याची गोडी लावणारे ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केले.
मा . विशाल रमेश राजगुरू संगीत शिक्षक यांनी, कुतूहल बालगीत या पुस्तक प्रकाशनासाठी स्वतःच्या अमूल्य वेळातला वेळ काढून, बालगीत संग्रहाचे पहिले बालगीत “किती कुतूहल बालजीवांचे?” या गीताला संगीतबद्ध केले स्वतःच्या स्वरात गायिले, पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी ही भेट दिली. त्याबद्दल सरांचे मनःपूर्वक धन्यवाद. खूप सुंदर चाल आणि सरांचा आवाज देखील. सर्वच लहान मुलांनी गुणगुणावे अशी चाल सरांनी या गाण्याला दिली आहे.
दुसर्या सत्रात “कवितांजली” पहिले खुले कवी संमेलन माय मराठी – २०२५ , या कविसंमेलनाचे अध्यक्ष पद डॉ. गजानन मिटके यांनी भूषवले आणि व कवींना खूप मोलाचं मार्गदर्शन केले.
कविसंमेलनात सहभागी कवी दिलीप जाधव (पालघर) नीरज रोकडे (कल्याण ) ग्रामीणकवी चंद्रकांत जोगदंड (पुणे )लक्ष्मण माने (नवी मुंबई ) शुभा थुलकर (नागपूर ) निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव पुणे विवेक जोशी (ठाणे ) अमित गायकर (पनवेल ), सिमा कांबळे (पुणे )या सर्व कवी आणि कवयित्रीनी सहभाग नोंदावल.या संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे मध्यवर्ती भावना “मराठी भाषा” होती.
कवींनी आपल्या कवितांमधून मायबोली मराठीचे सौंदर्य, गोडवा, वैशिष्ट्ये आणि तिचे आपल्याशी असलेले अतूट नाते अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडून दाखवले. “मराठी ही केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे, ओळख आणि आपले अस्मितेचे प्रतीक आहे” – हे कवितांमधून क्षणोक्षणी अधोरेखित झाले.कवितांमधून मराठी भाषेच्या आजच्या स्थितीवरील चिंतन, इंग्रजी व अन्य भाषांच्या प्रभावातील काळजीही व्यक्त झाली. काहींनी बालपणातल्या मराठी पाठशाळेच्या आठवणी उभ्या करत तर काहींनी आईच्या गोड मराठी लळ्याचा भावनात्मक आविष्कार मांडला. सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात आले. आयोजकांनी पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात संमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
“माय मराठी कवितांजली” हा एक असा मंच ठरला जिथे मराठी भाषेच्या प्रेमाने भरलेली मने एकत्र आली आणि आपल्या मातृभाषेला कवितांमधून शब्दरूप प्रेम अर्पण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शंकर पाटील यांनी सांभाळाली तसेच कार्यक्रम उत्तम व्ह्यावा म्हणुन अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ चे संस्थापक श्री गणेश खाडे, खजिनदार मा. अनिल सोनवणे अध्यक्षा - सौ सुचिता खाडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमांची फोटोग्राही आणि चित्रीकरण मा. सुमित जैन आणि मा. पवन इंगोले यानी केले तसेच प्रोजेक्टर कुमारी सिद्धी कुरणे हिने अत्यंत .कुशलतेने हाताळले या सर्व युवा मंडळीनी माय मराठी भाषेच्या संमेलनासाठी परिश्रम घेतले.
प्रकाशन सोहळा वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.