बाबासाहेबांचा सांस्कृतिक लढा पुढे नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक सांस्कृतिक लढा अधिक सक्षमपणे पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई प्रदेश वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या भव्य प्रबोधनात्मक महोत्सवाच्या निमित्ताने यंदापासून ‘व्हीबीए सन्मान पुरस्कार २०२६’ (VBA Sanman Puraskar) देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी अधिकृतपणे या नव्या उपक्रमाची माहिती दिली.
वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश आयोजित ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या कार्यक्रमात बहुजन संस्कृती, कला आणि पुरोगामी विचारांचा जागर केला जाणार आहे. याच व्यासपीठावरून समाजातील वंचित, शोषित घटकांच्या हक्कासाठी आणि प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याविषयी सविस्तर माहिती देताना मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला केवळ राजकीय आणि सामाजिक हक्कच मिळवून दिले नाहीत, तर एक मोठा वैचारिक व सांस्कृतिक लढाही उभारला होता. बाबासाहेबांचा हाच सांस्कृतिक लढा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही यंदापासून ‘व्हीबीए सन्मान पुरस्कार २०२६’ ची सुरुवात करत आहोत. समाज परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या घटकांना बळ देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे.”
वंचित बहुजन आघाडीचा हा उपक्रम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची पेरणी करणाऱ्या आणि सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांना, कलावंतांना या पुरस्काराच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याने सध्या या ‘जलसा’ महोत्सवाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
