शेतकऱ्यांनी जात-धर्मापेक्षा शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे: ॲड. प्रकाश आंबेडकर

22 नोव्हेंबर 2026
2 Mins Read
6 Views
प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांची पत्रकार परिषद; नागपूर येथील पत्रकार भवनातील दृश्य

​केज (प्रतिनिधी): “शेतकऱ्यांचे प्रश्न हे जात आणि धर्माच्या पलीकडचे आहेत. जाती-धर्माच्या चौकटीत अडकून न पडता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघटित लढा उभारावा. जातपात की भाव, याचा निर्णय आता शेतकऱ्यांनीच घ्यावा,” अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एकत्र आले असून, मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.

​ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि शेतीचे भवितव्य या मुद्द्यांवर पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व संघटनांनी व्यक्त केले.

​संयुक्त लढ्याचा निर्धार आणि आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांची व्यापक एकजूट निर्माण झाल्यास सरकारवर दबाव आणून न्याय्य मागण्या मान्य करून घेता येतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘जाती-धर्मापेक्षा शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य’ या विचारावर सर्वच संघटनांनी सहमती दर्शवली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात; अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड, भाई रामदास जराते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, राज्य कृती समितीचे प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर कवठेकर, शेतकरी हक्क मोर्चाचे बीड जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख अजयसिंह राऊत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष सागर दुधाने, वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, शेकापचे धारूर तालुका चिटणीस परमेश्वर सोळंके यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांचे युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version