गुरुजींचे मार्गदर्शनच जीवनाचा खरा आधार; स्नेहमिलन सोहळ्यात न्यायाधीश प्रभाकर मोडक भावूक
वरोरा/चिमूर (प्रतिनिधी):
“उभ्या आयुष्यात अनेक गुरुवर्यांनी दिशा दाखवली, परंतु ठावरी गुरुजींनी केलेले मार्गदर्शन सर्वोत्तम ठरले. त्यांच्यामुळेच आम्ही आज या पदावर पोहोचलो आहोत,” अशा शब्दांत न्यायाधीश प्रभाकर मोडक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वरोरा तालुक्यातील अकोला नं. १ येथे आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
गहिवरवणारी आठवण
न्यायाधीश मोडक यांनी दिवंगत नक्षीणे गुरुजींच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, चिखलदरा येथील सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी जात असताना गुरुजींनी त्यांना खांद्यावर बसवून नदी पार करून दिली होती. अमरावतीला मुक्काम असताना गुरुजींनी स्वतः बेसन-भाकर खाऊन त्यांना हॉटेलमध्ये जेवायला लावले होते. ही आठवण सांगताना न्यायाधीशांचे डोळे पाणावले होते.
६६ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
५ डिसेंबर १९६० नंतर तब्बल ६६ वर्षांनी हे माजी विद्यार्थी एकत्र आले होते. या सोहळ्यात जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांनी शालेय जीवनातील गमतीजमती सांगितल्या. याप्रमेली शाळेचे पहिले शिक्षक नागोराव ठावरी आणि त्यांच्या पत्नी रेखाताई ठावरी यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शाळा विकासासाठी सव्वा लाखाचा निधी
केवळ आठवणीत न रमता या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभूमीबद्दलची कृतज्ञताही व्यक्त केली. उपस्थित मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून १ लाख २५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा विनियोग गाव आणि शाळेच्या विकासासाठी केला जाईल, असे अरुण उमरे यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाकर उमरे होते. सत्कारमूर्ती म्हणून नागोराव ठावरी, रेखाताई ठावरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपअभियंता वासुदेव मटाले, गुलाब उमरे, सदाशिव उमरे, शामदेव उमरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारोती अतकरे, उद्धव भोगेकर, रामहरी झुंगरे, लहानु बावणे, माधव जुनघरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण उमरे यांनी केले, संचालन शारदा उमरे यांनी तर आभार प्रदर्शन शामराव मटाले यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित माजी विद्यार्थी भारावून गेले होते.
