बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नांनी भाजप घायाळ; अमर साबळेंच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये वंचितचे तीव्र आंदोलन

औरंगाबाद (प्रतिनिधी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादग्रस्त ‘जेफ्री एपस्टीन’ प्रकरणातील संबंधांवरून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी, भाजपने खालच्या पातळीवरील टीका सुरू केली आहे. भाजप नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी साबळे यांच्या फोटोचे दहन करून घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
देशहिताच्या प्रश्नांवरून भाजपची पळकाढू भूमिका?
गत २ मार्च रोजी मुंबईत पार पडलेल्या “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनात बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एपस्टीनशी नेमका काय संबंध आहे?
- भारताची विदेश नीती अमेरिकेच्या दबावाखाली ठरवली जात आहे का?
- फ्रान्ससोबत झालेला राफेल करार आणि अमेरिकेसोबतचे देशविरोधी करार यावर सरकार गप्प का?
या प्रश्नांमुळे भाजपची कोंडी झाली असून, उत्तरे देण्याऐवजी अमर साबळे यांनी बेताल वक्तव्य करून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वंचितने केला आहे.
नेत्यांचा इशारा: “वक्तव्ये सुधारली नाहीत तर जशास तसे उत्तर देऊ”
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर व अन्य प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद नसल्याने भाजप नेते वैयक्तिक चिखलफेक करत आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती:
यावेळी नगरसेवक अमित भुईगळ, रूपचंद गाडेकर, सतीश गायकवाड, पंकज बनसोडे, संदीप जाधव, राहुल मकासरे, नगरसेविका करुणा जाधव, साधना पठारे, प्रशांत बोराडे आणि मेघानंद जाधव यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
